अनंतनाग: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील दुर्गम भागात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. अहलान गडोले परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात काही दहशतवादी असल्याची माहिती पोलीस आणि सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच जवान जखमी झाले, त्यानंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे दोन जवान शहीद झाले. तीन जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चकमकीत दोन स्थानिक नागरिकही जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील कोकरनाग भागातील अहलान गडोले येथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. जेव्हा दहशतवाद्यांनी सर्च ऑपरेशन करणाऱ्या जवानांवर गोळीबार केला, तेव्हा सुरक्षा दलांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिले, त्यानंतर चकमक सुरू झाली.
कठुआमध्ये दिसलेल्या चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी
दुसरीकडे, पोलिसांनी शनिवारी कठुआ जिल्ह्यातील ढोक भागात चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले. दहशतवाद्यांबाबत ठोस माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे पोलिसांनी जाहीर केले आहे. कठुआमध्ये ८ जुलै रोजी मछेडी येथील दुर्गम जंगल परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या शोध पथकावर हल्ला केला होता. यामध्ये एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणजेच जेसीओसह पाच जवान शहीद झाले.