नवी दिल्ली: वक्फ दुरुस्ती विधेयकावर शुक्रवारी झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला. हा गोंधळ थांबत नसल्याचे पाहून समितीच्या 10 खासदारांना दिवसभरासाठी समितीच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले. याआधी सभेदरम्यान विरोधी सदस्यांनी असा दावा केला की, कायद्याच्या मसुद्यातील प्रस्तावित बदलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ दिला जात नाही. आज (दि. २४) भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वाखालील जेपीसी काश्मीरचे मिरवाईज उमर फारूक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे मत ऐकणार होते.
सर्व 10 विरोधी खासदारांचे दिवसभरासाठी निलंबन
सभेत गदारोळ झाल्यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 वर संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीतून सर्व 10 विरोधी खासदारांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. निलंबित विरोधी खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवेसी, नासिर हुसेन, मोहिबुल्ला, एम अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुल हक, इम्रान मसूद यांचा समावेश आहे.
निशिकांत दुबे यांनी प्रस्ताव मांडला
भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी विरोधी सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. जे समितीने मान्य केले. भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी असा दावा केला की, विरोधी सदस्यांचे वर्तन लज्जास्पद आहे. कारण ते सभेत सतत गोंधळ घालत होते आणि असंसदीय भाषा वापरत होते.
मीरवाईजला बोलवण्यापूर्वी चर्चेत गोंधळ :
मीरवाईजला बोलावण्यापूर्वी समिती सदस्यांनी आपापसात चर्चा केली आणि यादरम्यान विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत गदारोळ झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप वक्फ दुरुस्ती विधेयकाचा अहवाल लवकरात लवकर स्वीकारण्याचा आग्रह धरत असल्याचा दावा विरोधकांनी केला. सभेत जोरदार वादावादी झाल्याने कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. मीरवाईज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पुन्हा बैठक सुरू केल्यानंतर समितीसमोर हजर झाले.