मुंबई: महाविकास आघाडीची मंगळवारी हॉटेल ट्रायडेंट येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याबाबत चर्चा सुरु आहे. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीलादेखील देण्यात आले होते. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यशील पुंडकर हे सहभागी झाले होते. परंतु, बैठक अपूर्ण असतानाच ते बाहेर पडले आहेत. आमचा महाविकास आघाडीच्या बैठकीत अपमान झाला, अशी प्रतिक्रिया पुंडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. “जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चेसाठी गेल्यानंतर तिथे आम्हाला तुम्ही बाहेर थांबा, असं सांगितलं. त्यानंतर आम्हाला तब्बल एक तास बाहेर ठेवले, आम्ही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहोत की नाही?”, असा सवाल धैर्यशील पुंडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
“मनोज जरांगे पाटील आणि ओबीसींच्या आंदोलनाबाबत स्पष्ट भूमिका घ्या, संदिग्ध राहू नका. तीनही पक्षाचा काही फॉर्म्युला ठरला असेल तर तो फॉर्म्युला आम्हाला सांगा. परंतु, त्यांचे आपापसात काही ठरलेले नाही. महाविकास आघाडीचं काही ठरलेलं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही. आम्ही सुरुवातीला एक-दीड तास बैठकीला बसलो. आम्ही त्यांना सांगितलं की या-या विषयांवर तुम्ही भूमिका मांडा. तसेच महाविकास आघाडीमध्ये आधी आम्हाला घ्या. आम्हाला तसं पत्र द्या. त्यावर त्यांचं म्हणणं आहे की, आम्ही विचार करतो. पण तेव्हापासून आम्ही बाहेरच बसलो आहोत”, अशी प्रतिक्रिया धैर्यशील पुंडकर यांनी दिली.
दरम्यान “आम्ही सीट मागितल्या नाहीत, तर त्यांच्याकडून फॉर्म्युला मागितला आहे. तुमचं पहिले ठरल्यानंतर आम्हाला सांगा. त्यानंतर आम्ही बोलू. आम्ही बैठकीच्या बाहेर असल्यामुळे त्यांना जातो, असे सांगून आलेलो नाही. पण ही वागणूक योग्य नाही. त्यांच्याकडून वंचितला अपमानास्पदच वागणूक मिळाली आहे, म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहोत. आम्ही वर्षानुवर्षे रस्त्यावर भांडणारे लोकं आहोत”, असं पुंडकर म्हणाले.
आम्ही “चर्चेची दारे बंद झाली असे म्हणत नाहीत. आम्ही पक्षस्तरावर चर्चा करु. सीट शेअरिंगबद्दल त्यांनी त्यांचा फॉर्म्युला ठरला असेल तर सांगावा. नसेल तर आमचा 12-12-12-12 चा फॉर्म्युला मान्य करावा. त्यांचे काही ठरत नाही. त्यांच्यात भांडणं सुरु आहे. हे ठरलेले आहे. आपल्याला कुणी कशी वागणूक दिली तर त्याबाबत पक्षस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल”, अशी सूचक प्रतिक्रिया पुंडकर यांनी दिली.