मुंबई : मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरात बनावट रुग्णालय चालवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खून प्रकरणातील फरार बनावट डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. परवेझ अब्दुल अजीज शेख असे आरोपीचे नाव आहे. तसेच बनावट रुग्णालय चालवल्याप्रकरणी त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 12 ने ही कारवाई केली आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी परवेज शेख याचा शोध घेत असताना मालाड येथील मालवणी परिसरातील बेकायदेशीर क्लिनिकचा भांडाफोड झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुलुंड पोलीस ठाण्यात 2023 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी हा मालवणी परिसरात बोगस डॉक्टर म्हणून अजिज पॉली क्लीनिक चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने अजिज पॉली क्लीनिकवर छापा टाकला. तेव्हा परवेज अब्दुल अजीज शेख हा कोणताही वैद्यकीय परवाना नसताना डॉक्टर असल्याचं भासवून बेकायदेशीररित्या रुग्णांना इंजेक्शन आणि सलाईन देऊन फसवणूक करत असल्याचं आढळून आलं.
तसेच आरोपीची पत्नी बीयूएमएस पदावर कार्यरत होती, मात्र तिच्याकडे बीयूएमएस पदासाठी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे पोलीस तपासात समोर आलं. अजीज पॉली क्लिनिकमध्ये हे दोन्ही बनावट डॉक्टर लोकांना विविध आजारांसाठी इंजेक्शन, सलाईन आणि औषधे देत असत असं उघड झालं. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून परवेझ अब्दुल अजिज शेख याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाणे, मालवणी पोलीस ठाणे आणि मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या बायकोविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.