मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे चांगलेच भोवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान क्रूरकर्मा औरंगजेबाबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी गौरवोग्दार काढल्याचे पडसाद मंगळवारी विधिमंडळात उमटले होते. सत्ताधारी पक्षांसह विरोधकांनीही अबू आझमीना देशद्रोही ठरवून सभागृहातून निलंबित करावे, अशी मागणी केली होती.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, औरंगजेबाचा गौरव करणारे अबू आझमी देशद्रोही आहे. हा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असून तो आम्ही कदापिही सहन करणार नाही. त्यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशी मागणी केली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार भास्कर जाधव यांचा सभागृहात आक्रमक पावित्रा पाहायला मिळाला. या सर्वांनीच आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज (दि. ५) रोजी अबू आझमीच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.