दादर (मुंबई): रस्त्यावरील फेरीवाल्याला आणि त्याच्या मालकाला धर्म विचारून मारहाण केल्याची धक्कादायक घटना दादर येथे घडली आहे. पहलगाम येथे धर्म विचारतून नागरिकांची हत्या केल्याच्या घटनेने देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, शुक्रवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्यापक संताप व्यक्त होत आहे. दादर पश्चिमेकडील मुस्लिम असलेल्या फळ विक्रेत्याला आधार कार्ड दाखविण्यास सांगितल्यानंतर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भाजपच्या नऊ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तानुसार, भाजप पदाधिकाऱ्यांनी फळ विक्रेत्याला लक्ष्य केले, त्याला त्याचा धर्म आणि नाव विचारले आणि नंतर त्याला मारहाण केली. माहीम विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांनी हि मारहाण केली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या कृतीचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला आहे, अनेकांनी त्यांचे वर्तन अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर देशात तणावाचे वातावरण असतांना ही घटना घडली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी नऊ भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि सध्या तपास सुरू आहे.