मुंबई : महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून, भाजपला १४५, शिवसेना (शिंदे) पक्षाला ८५ ते ८८ तर राष्ट्रवादी (अजित पवार) ५५ च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना पक्षाने लोकसभेला महायुतीत भाजप-राष्ट्रवादीपेक्षा स्ट्राईक रेट (४६ टक्के) अधिक राखल्याने विधानसभा जागावाटपात त्यांना झुकते माप मिळताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा विचार करून जागावाटप व्हावे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
शिवाय शिवसेना ठाकरे पक्षाला महाविकास आघाडीत ९० हून अधिक जागा मिळणार असल्याने शिंदे यांनी हा मुद्दा भाजपचे बडे नेते अमित शाह यांच्यापुढे मांडत शिवसेनेला किमान ९० जागा मिळाव्यात, अशी आग्रही मागणी केल्याची माहिती आहे. आघाडीत शिवसेना ठाकरे पक्षाला मिळणाऱ्या जागा आणि लोकसभेचा स्ट्राईक रेट या दोन बाबी शिवसेना शिंदेंच्या पथ्यावर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीतील १८२ जागांवरील जागावाटप होऊन तेथील उमेदवार जाहीर झाले आहेत. यात भाजपच्या ९९, शिवसेना शिंदे पक्षाच्या ४५, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ४५ जागांवरील उमेदवारांचा समावेश आहे. आता उर्वरित १०६ जागांवरील जागावाटप आणि उमेदवार ठरवण्यासाठी फडणवीस, अजित पवार दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते.