मुंबई : ‘लोकशाही’ या चित्रपटाचे पोस्टरनुकतेच लाँच झाले. घराणेशाहीतला हा सत्तासंघर्षात नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप? हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल यांचा हा चित्रपट आहे. १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून ‘लोकशाही’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले.
चार दशकांहून अधिक भारताच्या सिनेसृष्टीत आपला झेंडा मानाने उंचावून फडकवत आलेली ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड’, ‘लोकशाही’ चित्रपट प्रस्तुत करत आहे. पोस्टरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे विचारमग्न गंभीर अशा अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यासोबत समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन हात जोडून दिसत आहे. लाखोंच्या संख्येत असणाऱ्या जनतेसमोर ती काहीतरी आव्हान करत असल्याचे दिसत आहे.
“आपण भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहतो. लोकशाही अस्तित्वात असताना त्याला ठेच पोहचवणाऱ्या राजकारण्यांचं आणि त्यांच्या भ्रष्ट राजकारणाचं वास्तव प्रखरपणे सांगणाऱ्या ‘लोकशाही’चित्रपटाला नक्कीच तूफान प्रतिसाद मिळेल याची आम्हाला खात्री आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘लोकशाही’ महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा ‘लोकशाही’ चित्रपट संजय अमर यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘लोकशाही’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे.