मुंबई : हॉटेलच्या मालकी हक्काबाबत लघुवाद न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी २५ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लघुवाद न्यायालयातील अनुवादक दुभाषकाला बेड्या ठोकल्या आहेत. विशाल चंद्रकांत सावंत (४३) असे लाचखोर आरोपी अनुवादक दुभाषकाचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, यातील ६६ वर्षीय तक्रारदारांच्या हॉटेलच्या मालकी हक्काबाबत धोबी तलाव येथील लघुवाद न्यायालयात दावा दाखल आहे. या प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात प्रलंबित असून दाव्याचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने लावून देतो, असे सांगून लाचखोर अनुवादक दुभाषकाने तक्रारदारांकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. पैशांची मागणी झाल्याने तक्रारदारांनी एसीबीच्या मुख्यालयात धाव घेत तक्रार दिली.
एसीबीच्या पथकाने सोमवारी केलेल्या पडताळणीत आरोपी सावंत हा २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. एसीबीने तत्काळ लोकमान्य टिळक मार्गावरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून २५ लाखांची लाच घेताना आरोपी सावंतला रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी सावंतला अटक करण्यात आल्याचे एसीबीने सांगितले.