मुंबई : विल्सन या दुर्मीळ जनुकीय आजाराने त्रस्त असलेल्या २० वर्षीय मुलाचे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या तरुणाला त्याच्या आईने आपल्या यकृताचा तुकडा दान करून त्याला नवे जीवन दिले. कावीळ, थकवा, पोटदुखी अशा लक्षणांसह या तरुणाला मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयाचे यकृत प्रत्यारोपण सल्लागार डॉ. स्वप्नील शर्मा यांनी सांगितले की, हा तरुण विल्सन आजाराने ग्रस्त होता. या आजारात यकृत आणि इतर अवयवांमध्ये तांब्याचे प्रमाण अधिक जमा होते. यामध्ये यकृत प्रत्यारोपण हा एकमेव जीव वाचवणारा पर्याय होता. रुग्णाच्या आईने जिवंत दाता होण्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेतला. शस्त्रक्रियेनंतर, रुग्णाने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. आता त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून, यकृताचे कार्य हळूहळू सामान्य होत आहे. आईने दिलेल्या यकृतामुळे मुलाला जीवदान मिळाले आहे.