भिवंडी: इलेक्टोरल बाँड प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलेली इलेक्टोरल बाँड योजना हे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट आहे. मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे हे एक साधन आहे. भ्रष्टाचाराचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे. ” ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली, त्यांनी भाजपला देणगी दिली आहे. या पैशांचा वापर देशातील पक्ष फोडण्यासाठी होतो, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालय याची चौकशी करेल अशी अपेक्षा आहे.”
‘यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य नाही’
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने सांगितले की, नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेल्या इलेक्टोरल बाँड्सचा डेटा सार्वजनिक करावा. त्यानंतर देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिल्याची आकडेवारी समोर आली. हे देशविरोधी कृत्य आहे. यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य असू शकत नाही.”
ही पंतप्रधान मोदींची कल्पना
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “भाजप सरकार ईडी, सीबीआय, आयटीवर दबाव टाकून कंपन्यांकडून पैसे उकळत आहे. ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली, त्यांनी भाजपला देणगी दिली होती. सर्वोच्च न्यायालय याची चौकशी करेल अशी अपेक्षा आहे. संपूर्ण देशाची व्यवस्था भ्रष्टाचारात ढकलण्यासारखे आहे. ही पंतप्रधान मोदींची कल्पना आहे. हे नितीन गडकरींनी नाही, तर पंतप्रधान मोदींनी केले आहे.”
‘जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट’
पंतप्रधानांवर निशाणा साधत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी भारताची राजकीय वित्त व्यवस्था स्वच्छ करण्याबद्दल बोलले आणि इलेक्टोरल बाँड आणले, पण आता इलेक्टोरल बाँड्सचे सत्य देशासमोर आहे. पीएम मोदी आणि भाजपने मांडलेली निवडणूक रोख्यांची संकल्पना हे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट आहे.
तपास यंत्रणांवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, “सीबीआय, ईडी, आयटी ही भाजप आणि आरएसएसची शस्त्रे आहेत. या आता भारताच्या तपास यंत्रणा राहिल्या नाहीत. इलेक्टोरल बाँड घोटाळ्याशी संबंधित लोकांनी विचार करावा की, एक दिवस भाजप सरकार बदलेल. “यानंतर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा असे होणार नाही, असं देखील राहुल गांधी म्हणाले.