मुंबई : सोशल मीडिया ‘सोसेल’ तेवढा वापरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया शिबिरात बोलताना सोशल मीडिया वापरताना काय काळजी घ्यावी, याची नियमावली वजा सूचना कार्यकर्त्यांना केल्या. लोकसभेसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियासाठीची शस्त्र सज्ज करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचं नाही. तसेच कोणत्याही महिलेवर टीका करायची नाही. विनाकारण कोणालाही ट्रोल करु नका. जर आपल्याला कोणी काही बोलत असेल, तर त्याची रीतसर पोलीस तक्रार करा. तुम्हाला कोणावरही कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली, तर पक्षाकडून सर्व मदत केली जाईल. पक्ष म्हणून मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. परंतु, जर पोलिसांनी सांगितले की, आपल्याच कार्यकर्त्याची चूक आहे, तर मीच पोलिसांना त्याला टायरमध्ये घालायला लावणार आहे. आपल्या पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्व मदत पक्ष करेल.
अजित पवार म्हणाले की, आपण महायुतीमध्ये असलो तरी, फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा ही आपली आहे. फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे विचार आपण कधीच सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू माता जिजाऊच आहेत, ही माझी नाही तर आमच्या पक्षाची भूमिका आहे.