Chhagan Bhujbal: मुंबई: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण नको, अशी भूमिका भुजबळ घेतली आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ज्यांना कायदेशीर आरक्षण देऊ शकत नाही, त्यांना पाठी मागच्या दाराने कुणबी सर्टिफिकेट देत आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूने जे ओबीसी समाजाचे आहेत त्यांना उच्च न्यायालयात लढवून ओबीसीमधून बाहेर ढकलायचं असा दुहेरी कार्यक्रम सुरू आहे, असं देखील ते म्हणाले.
शेंडगेंचा भुजबळांना पाठिंबा
ओबीसी समाजात मराठा समाजाला घुसविण्याचा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. मंत्री छगन भुजबळांनी सरकारमध्ये राहून संघर्ष करावा, आम्ही बाहेर राहून संघर्ष करू असं भुजबळांना सांगितल्याचे देखील प्रकाश शेंडगे म्हणाले. तसेच ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणार असून 17 नोव्हेंबरला अंबडमध्ये विशाल ओबीसी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही प्रकाश शेंडगें यांनी केली. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीच्या नियुक्तीविरोधात ओबीसी संघटना कोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले.