मुंबई: नवी मुंबईतुन माणुसकीला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे. महिला दिनीच(8 मार्च) एका नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत नराधम आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नवी मुंबईच्या तळोजा फेज-2 मधील केदार गृह संकुल सोसायटीत घडली आहे. येथील एका नराधम विकृताने 8 मार्चला महिला दिनीच एका 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. नराधमाने चिमूकलीला गोड बोलून रुममध्ये नेले. त्यानंतर चिमूकलीसोबत त्याने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चिमूकलीने आरडाओरडा करून घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी चिमूकलीचा आवाज ऐकल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नराधम आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केलं. घटनेचा अधिक तपास तळोजा पोलीस करत आहेत.