कल्याण : डोंबिवली एमआयडीसी परिसरात झालेल्या दुर्घटनेत ६८ जण जखमी झाले होते. जखमी रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. त्यापैकी ५७ जखमी रुग्णांवर उपचार करून आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित ११ रुग्णांवर विविध रुग्णालयांत अद्यापही उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५ रुग्ण अतिदक्षता विभागात आणि ६ रुग्ण जनरल वॉर्डमध्ये दाखल असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत १० मृतदेह सापडले असून, त्यातील ३ मृतदेहांची ओळख यापूर्वी पटवून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आतापर्यंत आढळून आलेल्या काही शरीराच्या भागांचे डीएनए नमुने घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यापूर्वी घेण्यात आलेले डीएनए नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दुर्घटनेच्या घटनेनंतर सलग पाचव्या दिवशीही पालिकेचे अग्निशमन पथक, इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पथक, एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर हजर असून दुर्घटना स्थळावरील मलबा उचलण्याचे काम अजूनही सुरू असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.