कल्याण : कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्योतिषाकडे नेवून सतत आजारी पडत असल्यावर उपाय सांगण्यासाठी घेऊन गेले. मात्र रूममध्ये एका खुर्ची बांधून लुबाडणूक केल्याचा प्रकार कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात समोर आला आहे. मोबाईल व रोकड घेऊन पसार झालेल्यांमधील एका जणाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. कल्याण पूर्वेत राहणारे विजय गायकवाड हे केबल व्यावसायिक आहेत. तर त्यांची पत्नी ही माजी नगरसेविका आहे.
अधिक माहिती अशी की, दोघेही आजारी असल्याचा गैरफायदा घेत याच परिसरात राहणाऱ्या गिरीश खैरे याने गायकवाड यांना लुबाडण्याचा प्लॅन केला. त्यानुसार विजय गायकवाड यांना आपल्या ओळखीतील ज्योतिषाला तुमचा हात दाखवू, तो उपाय सांगेल असे आमिष दिले. यानंतर खैरेने विजय गायकवाड यांना आडीवली येथील एका इमारतीत नेले. तिथे आधीच दोन व्यक्ती उपस्थित होते. त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून गिरीश तेथून निघून गेला.
गिरीश निघून गेल्यानंतर त्या दोघांनी विजय गायकवाड यांना खुर्चीला बांधले आणि त्यांच्या जवळील मोबाईल व रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर दोघेही पसार झाले. गायकवाड यांनी स्वत:ची सुटका करत मानपाडा पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला.
डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी राम चोपडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. गायकवाड यांना त्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या गिरीश खैरे याला अटक करण्यात आली आहे. मात्र त्याचे दोन साथीदार अद्याप पसार आहेत. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.