पुणे : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. महिलांवरील हिंसाचारातं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातही महिलांवरील हिंसाचार, शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत मुली स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्या सेफ्टी टिप्सचा अवलंब करू शकतात? ते आपण जाणून घेऊया…
– महिला जर एकट्याने घराबाहेर पडत असाल तर त्यांच्या पर्समध्ये शॉक इफेक्टसह सेफ्टी टॉर्च असणे गरजेचे आहे. या सेफ्टी टॉर्च महिलांना एकट्या बाहेर असताना खूप उपयोगी पडू शकतात. या टॉर्चच्या मदतीने महिला स्वतःचे संरक्षण करू शकतात.
-महिलांच्या सुरक्षेचे साधन आठवले की, सर्वप्रथम मनात पेपर स्प्रेचे नाव येते. आपल्या बचावासाठी महिला वर्ग या पेपर स्प्रेचा वापर करू शकतात. पेपर स्प्रेची लहान बाटली तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकते. घराबाहेर पडताना हे साधन तुमच्या बॅगेत निश्चितपणे असायलाच हवे.
-पेपर जेलदेखील सुरक्षिततेसाठीचे एक उत्तम साधन ठरू शकते. हे जेल तुम्ही दुरूनही शत्रूवर वापरू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही बाहेर जाताना तुमच्या पिशवीत पेपर जेल घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. बाजारात अगदी सहज तुम्हाला हा जेल उपलब्ध होईल.
-ऑटो किंवा कॅबमध्ये चढण्यापूर्वी, आपल्या मोबाइल फोनसह वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो घ्या आणि तो तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवा. ऑटो कोड आणि त्याचा नंबर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
-जर रात्री उशीर झाला असेल आणि कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे, असे वाटत असेल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये, एटीएममध्ये किंवा वाटेत असलेल्या कोणत्याही दुकानात जा आणि तेथून मदत घेऊनच पुढे जा.
-तुमच्यावर हल्ला होऊ शकतो असे तुम्हाला वाटत असल्यास, किंचाळणे आणि स्वतःला वाचवण्यासाठी पळून जाण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करा. आपल्याकडे जे काही आहे ते शस्त्र म्हणून वापरा.
-हल्लेखोराच्या डोळ्यांवर बोटांनी मारा. जर हल्लेखोर तुमच्या समोर उभा असेल तर त्याला त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात लाथ मारा.