सध्या थंडीचे दिवस संपून उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. या वाढत्या तापमान आणि उष्णतेमुळे अंगाची अक्षरश: लाहीलाही होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अशाप्रकारे उन्हाचा चटका बसत असल्याने काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे. त्यात तुमचे कपडे अशा सीझनमध्ये हलके असावेत. याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
जर आपण हवामानानुसार कपडे परिधान केले नाही तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. असे असताना हलके आणि शरीराला आराम देणाऱ्या फॅब्रिकबद्दल बोललो तर कॉटनचे नाव सर्वात आधी येते. हे जगातील सर्वात लोकप्रिय असे फॅब्रिक आहे. उन्हाळ्यात, बहुतेक लोकांच्या कपाटात कॉटनच्या पोशाखांचा जणू संग्रहच दिसून येतो. अनेक पारंपारिक कपडे तसेच फॅशनेबल कपडे कापसापासून बनवले जातात, त्यामुळे यावेळी तुम्हीही उन्हाळ्यात सुती कपडे घाला. हे देखील तुम्हाला थंड ठेवेल. याशिवाय, त्याचे हलके रंग देखील तुम्हाला ऊर्जा देतील.
कॉटननंतर, लिननचा नंबर येतो. लिनन एक अतिशय मऊ आणि सैलपणे विणलेले फॅब्रिक आहे. हे कापड खूपच आरामदायक आहे. उन्हाळ्यात शरीरातून बाहेर पडणारा घाम लिनन पूर्णपणे शोषून घेतो. लिनन कपड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान केल्याने तुम्ही हवेच्या संपर्कात राहाल, अशाप्रकारे ते डिझाईन केलेले असते. हे तुमच्या शरीराला घाम येण्यापासून रोखेल. उन्हाळ्यात त्वचेच्या आजारांपासूनही तुमचा बचाव होईल.
यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उन्हाळ्यात शक्यतो घट्ट कपडे घालणे टाळा, कारण त्यामुळे रक्ताभिसरण बिघडते. असे झाल्यावर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यातच योग्य कपडे निवडा. सैल कपडे घातल्यास फायद्याचे ठरू शकते.