तरुण मुली असो वा महिला आपण सुंदर आणि आकर्षक दिसावं यासाठी प्रयत्न करत असतात. त्यात बहुतेक मुली नखांना आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी नेल पेंट अर्थात नेलपॉलिशचा वापर करतात. मात्र, त्याची योग्य पद्धत माहिती असल्यास नखे आणखीनच आकर्षक दिसू शकतील.
जास्त नेल पेंट लावल्याने नखांचे नैसर्गिक सौंदर्य आणि चमक कमी होते. याचे कारण म्हणजे नेल पेंट लावण्यापूर्वी आणि नंतर काय करावे हे सर्वांनाच माहीत नसते. पण, आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत, ज्यामुळे नखांची चमक टिकून राहील आणि नेल पेंटचा पोत देखील गुळगुळीत राहील, ज्यामुळे नखे खूप सुंदर दिसतील. नवीन नेल पेंट लावण्यापूर्वी जुनी नेल पेंट नेहमी काढून टाकावी. यासाठी नॉन-एसीटोन रिमूव्हर वापरावे. कारण, एसीटोन रिमूव्हर नखांमधील ओलावा काढून टाकतो आणि कोरडेपणा आणतो. नखे सुंदर दिसण्यासाठी, नेल पेंट लावण्यापूर्वी त्यांना चांगला आकार द्या.
तसेच जेव्हाही तुम्ही नेल पेंट काढाल तेव्हा बदाम तेल, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने नखांची मसाज करा. त्यांना अर्धा तास असेच राहू द्या जेणेकरून नखे तेलातील पोषक द्रव्ये व्यवस्थित शोषून घेतील. नेहमी उत्तम दर्जाचे नेल पेंट वापरा. चांगल्या प्रतीचा नेल पेंट बराच काळ टिकून राहू शकते आणि नखांना हानी पोहोचवत नाही. त्यामुळे गुणवत्तेशी तडजोड करू नका.