पुणे प्राईम न्यूज: लहान असताना मुलाला बोट धरून चालवणाऱ्या आई-वडिलांना वृद्धापकाळी याच मुलांची गरज असताना सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे अनेकजण आहेत. आई-वडील कसेही असले तरी म्हातारपणी मुलांनी त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. आपल्या कामातून दैनंदिन जीवनातून वेळ काढणेही तितकेच महत्वाचं बनलं आहे.
कामाच्या व्यापाने मुले व्यस्त असतात. पण अशा स्थितीतही त्यांनी आई-वडिलांना मायेचा हात देण्याची खरी गरज असते. ज्येष्ठांना मुलांनी नीट सांभाळले पाहिजे. याबाबत ठोस असा कायदा नसला तरी या वृद्धांसाठी सध्या असलेले कायदे, नियम यांचीही नीट अंमलबजावणी व्हायला हवी. बरेच ज्येष्ठ नागरिक बरीच वर्षे स्वतःची काळजी स्वतःच घेत असतात. पण त्यानंतर त्यांना ते शक्य होत नाही. अशावेळी कुटुंबाने एकत्र येऊन त्यांना झेपेल अशी मदत कशी पुरवता येईल याचा विचार करत सर्वांनी भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या पाहिजेत.
आई-वडील ही आपली प्रेमाची माणसं असतात. कोणतंही संकट उभं राहिलं तर सर्वात पहिल्यांदा तेच आपल्यामागे उभे राहतात. ठराविक वयानंतर आई-वडिलांना नेहमीच्या गोष्टी करणंही शक्य होत नाही. अशावेळी मुलांनी त्यांना नेमकी कोणती सुविधा पुरवली म्हणजे त्यांचे काम हलके होईल हे जाणून घेतले पाहिजे. त्या-त्या सुविधा त्यांना पुरविण्याचा प्रयत्न मुलांनी करायला हवा.
आपल्या आई-वडिलांना घरात चालायला-फिरायला, अंघोळ व इतर गोष्टी करायला आपली काय मदत होऊ शकते याचा विचार मुलांनी केला पाहिजे, असे केल्यास आई-वडिलांना नक्कीच आधार पोहोचू शकतो. परिणामी, कुटुंबामध्ये अधिकच आनंद निर्माण होऊ शकतो.