सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळा आला की, तापमानाचा पारा वाढतो आणि त्यासोबतच अनेक लोकांचा मूडही बदलू लागतो. सामान्यतः, फक्त हिवाळ्यातच लोकांना नैराश्य येते, असा समज आहे. मात्र, अति उष्णतेचा मानसिक स्थितीवरही खोलवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तापमान सतत वाढत असते, तेव्हा ते शरीर आणि मन दोन्हीवर दबाव आणते.
उन्हाळ्यात झोपेचा त्रास, पाण्याची कमतरता आणि सतत घाम येणे यामुळे शरीर थकते. पण खरा परिणाम मेंदूवर होतो. मूड स्विंग्स, चिडचिडेपणा आणि नैराश्य ही सामान्य लक्षणे आहेत. हा काही आजार नाही, तर एक प्रकारची मानसिक प्रतिक्रिया आहे जी अति उष्णतेशी आणि बाह्य वातावरणाशी संबंधित आहे. उन्हाळ्यात दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात. तेजस्वी सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानाच्या संपर्कात आल्याने झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि व्यक्तीला थकवा जाणवतो.
याशिवाय, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मेंदूला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे मूडवर परिणाम होतो. यामुळेच उन्हाळ्यात चिडचिड, थकवा आणि आळस जास्त प्रमाणात आढळतो. उन्हाळ्याच्या काळात आपल्या शरीराच्या हार्मोनल सिस्टीमवरही परिणाम होतो. विशेषतः, सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या ‘फील गुड’ हार्मोन्सची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे