पुणे : राज्यात पुढचे चार ते पाच दिवस संमिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामान असणार आहे. तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सांगली, सातारा,आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्ण व दमट हवामान राहील. तसेच पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. राज्याच्या इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपीट होईल, असा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 27 एप्रिलला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना 28 एप्रिलला ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोलीमध्ये पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे.