मुंबई : सागरी मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.जेएनपीए ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचा प्रवास आता सुस्साट होणार आहे. बंदरातून मुंबईतील प्रवाशांसाठी अद्ययावत दोन स्पीड बोटी धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या शुक्रवारी जेएनपीए ते गेटवे ऑफ इंडियामार्गावर स्पीड बोटींची ट्रायल घेण्यात येणार आहे. ती यशस्वी झाल्यानतंर लगेचच प्रवासी वाहतूक सुरू करण्यास ग्रीन सिग्नल देण्यात येणार आहे. या प्रदुषणविरहित स्पीट बोटींमुळे तासाचा प्रवास 35 ते 40 मिनिटांत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळेत मोठी बचत होणार आहे.सागरी स्पीड बोटींच्या सेवेचा बंदरात कामकाजासाठी मुंबईतून ये-जा करणाऱ्या कामगारांना फायदा होणार आहे. तसेच प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ आणि फॅमिली मेंबर्स, पोर्ट युजर्स आदी कामगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे वेळही वाचणार आहे.
मुंबई ते जेएनपीए प्रवासी संख्या कमी झाले आहे. तसेच लाकडी बोटी या सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर चालणाऱ्या बोटींचा पर्याय निवडला आहे. या बोटी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी-सुविधांनी सुसज्ज आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा अधिक फायदा होणार आहे.