हडपसर, (पुणे) : घरफोडीचे तब्बल 40 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला व त्याच्या एका साथीदाराला हडपसर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या एका सराफालाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
राजेश राम पपूल उर्फ चोर राजा (वय 40, रा. दुगड चाळ, कात्रज),असे अट्टल चोरट्याचे नाव आहे तर त्याचा साथीदार प्रदीप उर्फ गणेश बाळासाहेब गाडे (वय 35, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता), व सराफ व्यावसायिक कुणाल रुपेश वाफगांवकर (वय 23, रा. सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश राम पपूल उर्फ चोर राजा याच्यावर चोरीचे 40 गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. तर त्याचा जोडीदार प्रदीप याच्यावर घरफोडीचे 5 गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटा राजेश चोर राजा या टोपन नावाने ओळखला जातो. त्याच्यावर घरफोडीचे 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजेश व प्रदीप यांनी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने रांजणगाव, कात्रज, हडपसर परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते.
हडपसर पोलिसांनी सापळा लावून दुचाकीस्वार राजेश आणि साथीदार प्रदीप यांना पकडले. तपासात दोघांनी हडपसर भागात आठ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यांनी चोरलेल्या दागिन्यांची सराफ व्यावसायिक कुणाल वाफगावकर याला विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने वाफगावरकर याला अटक केली.
दरम्यान, चोरटा याच्यासह साथीदाराला हडपसर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील अटक करण्यात आली आहे. तो चोर राजा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्याकडून 8 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, चंद्रकांत रेजीतवाड, सागर ननावरे यांनी केली.