पुणे : लेण्याद्री येथील अष्टविनायक श्री गिरिजात्मजाचे दर्शन घेणे सोयीस्कर व्हावे, यासाठी आता जिल्हा प्रशासनाकडून रोप वे अथवा लिफ्ट बससाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज लेण्याद्री (ता.जुन्नर) येथे बोलताना सांगितले.
गणेशोत्सव काळात लेण्याद्री येथील सुविधांविषयी पाहणी आयुष प्रसाद यांनी केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
आयुष प्रसाद म्हणाले, “रोप वे अथवा लिफ्ट बससाठी मेट्रो कंपनीसह आणखी एका कंपनीबरोबरच चर्चा झाली आहे. लवकरच लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.रोपे वे साठी देखील दोन कंपन्यांशी संपर्क झाला असून खासदार अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा करून रोप वे साठी प्रयत्न सुरू आहेत,”अशी माहिती आयुष प्रसाद यांनी दिली.
गणेशोत्सवात पाणी, वाहनतळ,शौचालय, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. गरज भासल्यास जिल्हा परिषदेमार्फत शौचालय व आरोग्य सेवा पुरवण्याबाबत आयुष प्रसाद यांनी सूचना दिल्या.
यावेळी देवस्थानच्या वतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी,तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांमधून संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, गणेश वन व दर्शन मार्गावर पथ दिवे यासाठी मान्यता मिळून निधी उपलब्ध व्हावा अशी जितेंद्र बिडवई यांनी केली.