धाराशिव : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण ढवळून निघालेल असताना आता मराठवाड्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडला लागून असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील भूम मध्ये एका तरुणास रॉड आणि काठीने अमानुष मारहाण करत रस्त्यावर फेकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील पाथरूड येथील माऊली बाबासाहेब गिरी या 18 वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मृत झाल्याचे समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना मंगळवारी समोर आली. या तरुणावर उपचार सुरू असून तो मृत्यूची झुंज देत आहे. याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
याबाबत वडिलांनी परंडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तीन मार्चला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माऊलीला परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप व इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. त्यानंतर त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचा फोन बंद येत होता. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांनी भाऊ व मित्राला याबाबतची माहिती देऊन माऊलीचा शोध घेण्याची माहिती दिली.
त्यानंतर सायंकाळी काळेवाडी येथील पोलीस पाटलांनी बाबासाहेब गिरी यांना फोन करून त्यांचा मुलगा माऊली याला जबर मारहाण करून फेकून दिले असल्याचे सांगितलं त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारानंतरही त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याला अखेर सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.या रुग्णालयात तो मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने सर्व परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.