पुणे : गेल्या काही दिवसापासून महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले तरीही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे. मात्र आता नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदांची घोषणा यापूर्वी केली होती. नाशिक जिल्ह्यासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि रायगडमध्ये अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र अवघ्या एका दिवसातच या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. मात्र आता पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय शिंदे आणि पवारांच्या कोर्टात गेला आहे. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपकडून नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत आग्रही भूमिका घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.