पुणे : ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झालं आहे. शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. 2009 ते 2014 या कालावधीत ते राज्यमंत्री होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणारे सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. भास्कर जाधव हे अतिशय आक्रमक नेते आहेत, त्यांच्या आक्रमकतेचा फायदा आता पक्षाला होऊ शकतो.
विरोधी पक्षनेते पदासाठी उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांचं नावही चर्चेत होतं मात्र आता ठाकरे विरोधी पक्षनेते होणार नसल्याचे स्पष्ट झालं. महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.आता या नावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मंजुरी मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा दारुण पराभव झाला होता.यामध्ये आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षाचे 20, काँग्रेसचे 16,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार निवडून आले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वबळावर मिळवण्याच संख्याबळ कोणत्याही एका पक्षाला नाही त्यामुळे विरोधी पक्षनेते पद रिक्त राहणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आल आहे.