कर्जत : सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी स्त्रियांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहे. शिक्षणामुळे स्त्रियांना मानाचे स्थान मिळालेले आहे. सध्याच्या काळात घरासोबतच शाळा महाविद्यालय हे संस्कार केंद्र बनलेले आहे. पूर्वीचे आणि आत्ताचे स्त्रियांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे झालेले आहे. चूल आणि मूल एवढे स्त्रियांचे कार्यक्षेत्र राहिलेले नसल्याचे प्रतिपादन श्रीगोंदाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी व्यक्त केले.
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये कर्जत पोलीस ठाणे व दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने महिला सशक्तीकरण कार्यक्रम बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ या व इतर मुद्द्यावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीगोंदाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख उपस्थित होते. यावेळी शेख बोलत होते.
यावेळी डी एम गिरी, एम जे शेख, कर्जत न्यायालयातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर. व्ही. थाईल हेही उपस्थित होते. दादा पाटील महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सीनियर विभागातील व ज्युनिअर विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमा वेळी कर्जत बार असोसिएशनचे वतीने माननीय श्री शेख साहेब व इतर न्यायाधीश यांचा सत्कार करण्यात आला.
यापुढे बोलताना मुजीब शेख म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपआपली ध्येय ठरवून घ्यावी. अडचणींवर मात करून घेण्यासाठी सतत प्रयत्न करा. आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करा. एकाग्रतेचा वापर शिक्षणासाठी करा आणि जीवन जगत असताना मनामध्ये अहंकार न बाळगता आत्मविश्वास बाळगण्याचे आवाहन केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव म्हणाले, “सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठीच करा आणि प्राचीन काळी महिलांना असलेले स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असा मनोदय त्यांनी आपल्या भाषण व्यक्त केला. या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर माधुरी गुळवे यांनीही महिला सशक्तिकरण करण्यासंदर्भात कॉलेजची भूमिका स्पष्ट केली. कामामध्ये कॉलेजच्या चार विद्यार्थिनींनी मुलींना कोणत्या प्रकारे त्रास होतो याबाबत तसेच कर्जत पोलिसांचे वेळोवेळी मदत व मार्गदर्शन तत्काळ मिळत असते याबाबत समाधान व्यक्त केले.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले, “कर्जत पोलीस मुली आणि महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळोवेळी शाळा कॉलेजला भेटी देत असून अगदी मुलींची पोलीस स्टेशनला सहल सुद्धा काढली होती. कर्जत तालुक्यात सध्या मुलींना व महिलांना स्वतःच्या घरानंतर पोलीस स्टेशन हे हक्काच घर वाटावं यासाठी काम करत आहोत. यामध्ये चांगल्या प्रमाणात नक्कीच यश आल्याचं सांगितलं. वेळोवेळी शाळा कॉलेजला भेटी देऊन मुलींना बोलत केल्याने आणि त्यांना विश्वास दिल्याने खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्या तक्रारींचं कर्जत पोलिसांनी निरसन केलं आहे. यापुढेही कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास कोणी त्रास देत असल्यास थेट कर्ज पोलीस स्टेशनला अथवा स्वतःच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन यादव यांनी केले.” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्वप्निल मस्के यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉक्टर प्रमोद परदेशी यांनी मानले.