यवत(पुणे): जिल्ह्यातील सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे संपन्न झाला.
माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सैनिक दरबार’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे विवेक मासाळ, जिल्हा परिषदेचे सहा. विशेष अधिकारी बी. दरवडे, तहसिलदार (महसूल शाखा) उमाकांत कडनोर, निवृत्त कर्नल प्रमोद दहीतुले तसेच इतर कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील जवळपास 250 हून अधिक वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, सेवारत, सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी उपस्थित होते.
सैनिक दरबारासाठी जिल्ह्यातून सुमारे 90 अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जावर जिल्हाधिकारी यांनी चर्चा करुन अर्जदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे आलेले अर्ज कार्यवाहीसाठी पाठवून त्यांचा अहवाल घेण्याबाबत आदेश दिले. पुढील सैनिक दरबार 30 जून 2025 रोजी आयोजित करण्यात येईल तसेच आजच्या दरबारातील अर्जांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त) यांनी उपस्थितांना सैनिक कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा व योजनांची माहिती दिली.