पुणे : शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी जड वाहनांवर बंदीची मागणी करणाऱ्या पुणे पालिका आयुक्ताना ” वहातुक कोंडी कमी करायाची असेल तर सर्व बीआरटी मार्ग बंद करा असा पत्ररूपी सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला असून या आशयाचा पत्र व्यवहार पुणे पोलिसांनी पालिका प्रशासनाला पाठविले आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सल्ल्यामुळे पालिका प्रशासन नक्की काय भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.
अहमदनगर, सातारा तसेच सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्ग बंद करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या असून यासाठी दिवाळीच्या आठवडाभर आधी झालेली वहातुककोंडी कारणीभूत ठरली आहे. दिवाळीत देखील हिच परिस्थिती कायम राहिल्याने पालिकेने पालिका व पोलीस यांनी एकत्र काम करावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी २४ रस्त्यांवरील खड्डे, बीआरटी मार्ग आणि सायकल ट्रॅक हेच खरे वहातुकीतील अडथळे असल्याचा घराचा आहेर पालिका प्रशासनाला दिला.
पोलीस आयुक्तांचे पत्र :
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार, “ अहमदनगर, सोलापूर आणि सातारा रस्त्यावर महानगरपालिकेने बीआरटी योजना राबवली आहे. यापैकी नगर रस्ता राज्य मार्ग तर सोलापूर व सातारा रस्ता हे राष्ट्रीय महामार्ग आहेत. इतर जिल्ह्यांतून मुंबई, अहमदनगर, सोलापूर, सातारा या ठिकाणी जाणारी बहुतांश वाहने शहरातील याच मार्गावरुन जातात. या मार्गांवर जड वाहनांची संख्या देखील अधिक आहे.
या सर्व मार्गांवर बीआरटी योजना असल्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग हा फक्त पीएमपीसाठीच वापरला जातो. उर्वरित रस्त्यावर वाहतुकीचा ताण येऊन वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. बीआरटी मार्गातून पीएमपी सोबतच इतर वाहनेही अतिक्रमण करत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. बीआरटीचे थांबे रस्त्याच्या मध्यभागी असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळेही अपघात वाढत आहेत. शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक करण्यात येत असले तरी बऱ्याच ठिकाणी सायकल ट्रॅकचा फारसा वापर होत नाही. त्यामुळे सर्व बीआरटी मार्ग बंद करून सायकल ट्रॅक काढल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.