जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू-काश्मीरला गेले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेनेच्या वतीने पर्यटकांना आणण्यात येत आहे. जे कधी विमानात बसले नाही त्यांना विमानाने परत आणत आहोत असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवीन वादाची ठिणगी पडली आहे.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी आता विमानतळावर आणलं. ती लोकं पहिल्यांदा विमानाने प्रवास करत आहेत. ती रेल्वेने गेली होती. घाबरलेली लोकं आहेत. त्यांना विमानात बसवून महाराष्ट्रात आणत आहेत. या कामांना कपरघोडी म्हणताय?”, असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं. नरेश म्हस्के यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, संबंध देश शोकसागरात बुडाला आहेत. सर्वजण दु:खात आहेत, वेगळ्या संवेदनात आहेत तेव्हा सत्ताधाऱ्यांनी भान बाळगलं पाहिजे. जी माणसं कधीच विमानात बसली नाहीत त्यांना तुम्ही विमानात बसवली म्हणजे उपकार केले का तुम्ही?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.