पुणे : स्वारगेट बसस्थानक आगारात एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे विभागातील 14 आगारांअतर्गत येणाऱ्या 42 बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. त्यानुसार हे ऑडिट पूर्ण झाले असून सर्व बस स्थानकावर सुरक्षारक्षक,सुरक्षा भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्यवस्थेच्या गोष्टींची कमतरता आढळून आली आहे.
स्वारगेट येथील घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे राज्य सरकार आणि परिवहन खात्याला ही खडबडून जाग आली. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील सर्वच बस स्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे असे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले. त्यानुसार पुणे विभागातील 42 बस स्थानकावर सुरक्षा ऑडिट करताना प्रत्येक बस स्थानकात प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरे,सुरक्षा रक्षक, सुरक्षा भिंत आहे का? या चार गोष्टी तपासण्यात आल्या होत्या.परंतु बहुतांश बस स्थानकावर या गोष्टींचा अभाव दिसून आला. त्यानंतर विभाग नियंत्रक यांनी सुरक्षेविषयी ज्या गोष्टींची कमतरता आहे त्याविषयीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असल्याचे सांगितले आहे.
स्वारगेट आगारात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यातून धडा घेत भविष्यात असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले असून याबाबत ठोस उपाय योजना करण्यात येत आहेत.