राहुलकुमार अवचट
यवत : यवत येथील वार्ड क्र. २ येथे असलेला कचरा डेपो त्वरित बंद करा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. वार्ड क्र. २ येथील तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, पशुवैद्यकीय रुग्णालय या शासकीय कार्यालयांबरोबरच यशवंत नगर रहिवासी वस्ती, स्मशानभूमी व दफनभूमी तसेच मोठ्या संख्येने लोकवस्तीच्या मधोमध असणाऱ्या खाणीमध्ये काही वर्षापासुन गावातील नागरिक ओला व सुका कचरा टाकत आहेत.
सुरूवातीला खाण खोल असल्यामुळे या कचऱ्याचा त्रास स्थानिकांना होत नव्हता. परंतु सध्या खाण पूर्ण भरल्याने कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर टाकला जात आहे. यामुळे नागरीवस्तीत मोठ्या प्रमाणावर त्रास होत असुन दुर्गंधी, डास, लहान-लहान किडे यांचा त्रास वाढु लागला आहे. गेल्या १० दिवसांपासुन यशवंतनगर व झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यु, मलेरिया, चिकनगुन्या यासारख्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
प्रत्येक घरात ४ रुग्ण असुन त्यांची आर्थिक, मानसिक व शारीरीक हानी या कचरा डेपोमुळे होत आहे. सरकारपड जागेवर कचरा डेपो असा शेरा नसताना सुद्धा ग्रामपंचायतीने येथे कचरा डेपो नियोजित केल्याने येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा पुर्ण विरोध असून याची गांभीर्याने दखल घेऊन कचरा डेपो त्वरीत बंद करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत उपयोजना न केल्यास त्रस्त नागरीकांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामपंचायत आरोग्य कर घेवुन गोरगरीब जनतेची अशा प्रकारे टिंगल करत असेल तर ती बाब आपणास अशोभनीय असल्याची खंत स्थानिक व्यक्त करत आहे. याबाबत निवेदन सरपंच समीर दोरगे यांना देण्यात आले असून यावेळी डॉ. संतोष बडेकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर, अरविंद दोरगे यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.