Political News : काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांना अखेर काँग्रेसने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, व नंतर विचार करू, असा सल्ला दिला, त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
सरकार विरोधात उघड भूमिका
बैतुल जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी असलेल्या निशा बांगरे यांनी शिवराजसिंह चौहान सरकारच्या विरोधात उघड भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेचे काँग्रेसने समर्थन केले होते. तेव्हापासून त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यासाठी त्यांनी गेल्या जून महिन्यात उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा दिला. त्यांना बैतुल जिल्ह्यातील आमला या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती.
परंतु राज्य सरकारने त्यांचा राजीनामा मंजूर केला नाहीच, पण उलट त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचा ससेमिरा लावला. व अखेर त्यांना सर्वोच्च न्यायालयातून राजीनामा मंजूर करून घ्यावा लागला. परंतु तोपर्यंत काँग्रेसने आमला मधून मनोज माल्वे यांना उमेदवारी घोषित केली. भविष्यात दखल घेऊ असे त्यांना सांगण्यात आले.
निशा बांगरे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर मग त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसची सदस्यत्व स्वीकारल्या नंतरच आपल्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी विचार करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार निशा बांगरे यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले.
परंतु निशा बांगरे यांना सध्यातरी पक्षसंघटनेत काम करावे लागेल. मात्र भविष्यात निशा बांगरे यांच्या कार्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांनी निशा बांगरे यांच्या उमेदवारीवर फुली मारली आहे.