मंचर, (पुणे) : टाकेवाडी (ता. आंबेगाव) येथील डिंभे धरणाच्या पाण्यात उडी मारलेल्या प्रेमी युगलांचा मृतदेह वेगवेगळ्या दोन ठिकाणी कालव्यात आढळून आले आहेत. याप्रकरणी मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
कविता सुनील पारधी (वय- 36, रा. टाकेवाडी-ठाकरवाडी) व पप्पू लक्ष्मण खंडागळे (वय 33 रा. जऊळके बुद्रुक ठाकरवाडी, ता. खेड) या प्रेमीयुगलांनी शनिवारी (ता. 05) पहाटे धरणात उडी मारली होती.
कविता पारधी या गेल्या 12 ते 15 वर्षांपासून माहेरी आई संगीता राजू काळे यांच्याकडे राहत होत्या. शनिवारी पहाटे कविता, पप्पू व कविताची मामेबहीण दिव्या राजाराम काळे हे दुचाकीने टाकेवाडी येथील ठाकरवाडीकडे शनिवारी (ता. 5) पहाटे चारच्या सुमारास जात होते. या वेळी टाकेवाडी गावाजवळील कालव्याजवळ आल्यानंतर कविता व पप्पू यांच्यात भांडण झाले. त्यानंतर कविताने कालव्यात उडी मारली. तिला वाचविण्यासाठी पप्पूने उडी मारली होती. काही वेळातच दोघेही पाण्यात दिसेनासे झाल्यानंतर दिव्या घाबरून जवळच असणारे शेतकरी रामदास चिखले यांच्या शेडमध्ये घाबरून जाऊन बसली, दरम्यान, रामदास चिखले यांनी मुलाला पहिले असता तिने त्यांना घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर पोलिस पाटील उल्हास चिखले, उपसरपंच समीर काळे, ग्रामस्थ राहुल चिखले, भानुदास चिखले, रवींद्र काळे, अनिल जाधव, शांताराम चिखले, विशाल चिखले यांनी घटनास्थळापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरापर्यंत डाव्या कालव्याची पाहणी करत कविता व पप्पू यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाही.
डावा कालव्यात 400 क्युसेकने पाणी वाहत असल्याने बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेणे कठीण झाले होते. यासाठी मंचर पोलिसांनी तहसीलदारांकडे कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली व त्यानुसार जलसंपदा विभागाच्या वतीने कालव्यातील पाण्याचा वेग कमी करण्यात आला होता.
दरम्यान, पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर प्रथम कळंब गावच्या हद्दीत कविता पारधी हिचा मृतदेह पुलाच्या कॉलमला अडकल्याच्या अवस्थेत रविवारी दुपारी 1 वाजता सापडला, तर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत घाटाजवळ कालव्यात पप्पू खंडागळे याचा मृतदेह शेतीपंपाच्या मोटारीच्या पाइपला अडकलेल्या अवस्थेत रविवारी दुपारी अडीच वाजता सापडला आहे. दोघांचेही मृतदेह नातेवाइकांसमोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.