N. R. Narayana Murthy : नवी दिल्ली : देशाची प्रगती व्हावी, असं वाटत असेल तर तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केलं पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ उद्योजक नारायण मूर्ती यांनी दिला . त्यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काही वर्षांपासून नोकरदार क्षेत्रामध्ये स्पर्धा खूप वाढली आहे. ही स्पर्धा इतकी वाढली आहे की, आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसत आहे, अशातच इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी केलेलं वक्तव्य खूप गाजतयं.
राधिका गुप्ता यांनी सुनावले : वर्क-लाइफ बॅलन्सचा हवाला देत त्यांच्या विधानाशी अनेक जण सहमत नव्हते. अशातच एडलवाईस कंपनीच्या सीईओ राधिका गुप्ता यांनीही नारायण मूर्तींना सुनावलं आहे. राधिका गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाव न घेता नारायण मूर्ती यांच्यावर टीका केली. देशबांधणीसाठी घर आणि नोकरी यांमध्ये समतोल राखताना भारतीय महिला ७० हून अधिक तासांसाठी काम करत त्यांचं योगदान देत आहेत. वर्क-लाइफ बॅलन्स करत एक नवी पिढी घडवत आहेत. कैक वर्षांपासून दशकांपासून हे असंच सुरू आहे. तेसुद्धा चेहऱ्यावर हास्य ठेवून आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता”, असंही त्यांनी लिहिलं आहे.
७० तास काम करण्याच्या विधानावर महिलांची बाजू मांडताना त्या पुढे म्हणत आहेत की, गंमत म्हणजे आमच्याविषयी कोणीही, कोणताही प्रतिसाद करताना किंवा मतं मांडताना दिसत नाहीये, असा टोला लगावत राधिका यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आणला. त्यांनी ही पोस्ट २९ ऑक्टोबरला केली. अनेक लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, काहींनी नारायण मूर्तींच्या या विधानावर प्रतिक्रीया देताना त्यांचं जीवन जगून झालंय. आता ते तरुणांचं जीवन बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, इथपर्यंतची टीकाही केली आहे.