पुणे : शहरात गेल्या काही आठवड्यापासून नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढत आहे. दुसरीकडे संभाव्य पाणी टंचाईचा सामना देखील करावा लागत आहे.या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना पावसाळ्यापर्यंत शुद्ध पाणी देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महत्वाच्या उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उन्हाळ्यात अनधिकृत पाणी वापरामुळे अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेच्या वतीने महत्वाच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यामध्ये पंपाद्वारे थेट लाईन वरील पाणी खेचण्यास बंदी व असे आढळल्यास कारवाई, अनधिकृत कनेक्शन वर कडक कारवाई, रेन वॉटर हार्वेस्टिंगची देखभाल करणे, नवीन पाणी पुरवठा कनेक्शन साठी पुढील दोन महिने स्थगिती, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणाऱ्या व्यापारी वसाहती मधील पाणी पुरवठा थांबविण्याची शक्यता, गाड्या, रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या २०११ साली १७ लाख होती. तीच आज ३५ लाख झाली आहे. परंतु, पाणी पुरवठा फक्त ३५ % ने वाढला आहे. तरी देखील महापालिकेच्या वतीने नागरिकांना वर्षभर सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, आता संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महानगरपालिका उपाययोजना करणार आहे.