पुणे : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मनसेकडून आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने जोरदार मोर्चे बांधणी केली असून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
कोणावर कोणती जबाबदारी?
बाळा नांदगावकर- गट अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणे
नितीन सरदेसाई- विभाग अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणे
अमित ठाकरे- शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणे
मुंबई शहराध्यक्ष- संदीप देशपांडे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पक्षाच्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.दरम्यान, मनसेच्या मुंबई शहराध्यक्षांसह तीन उपाध्यक्ष काम करणार आहेत.