उरुळी कांचन, (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे-पुढे करण्याबरोबरच, त्यांच्याशी विकासाचे नाते सांगणारे शेकडो नेते लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीत असतानाही, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पूर्व हवेलीमधील सर्वच गावांमध्ये मतांची लयलुट केल्याचे दिसून आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान पुर्व हवेलीत उरुळी कांचन व लोणी काळभोर या दोन ठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या. या दोन्ही प्रचार सभेवेळी अजित पवारांच्या मांडीला मांडी लाऊन स्टेजवर बसलेल्या बहुसंख्य नेत्यांनीच हातातील घड्याळ लपवून तुतारी वाजवल्याने डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय सोपा झाल्याचे पुढे आले आहे. पुर्व हवेलीमधील नेत्यांच्या या कृत्यामुळे बहुचर्चित लोणी काळभोर गावच्या नियोजित पाणीपुरवठा योजनेसह यशवंतचे भविष्यही अंधारमय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच पक्षांतील नेत्यांनी पूर्व हवेलीतील मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी मतदारांच्या संपर्कात रहाण्याची गरज आहे. कारण महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना कदमवाकवस्ती या एकाच गावामध्ये फक्त 187 मतांची आघाडी असून इतर सर्व गावात अमोल कोल्हे यांना आघाडी मिळालेली आहे.
लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना झालेले मतदान हे शरद पवार यांना मिळालेल्या सहानुभूतीचे उदाहरण आहे. त्यामुळे आमदार अशोक पवार यांनीही आनंदी न होता मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी मतदारांच्या संपर्कात रहाण्याची गरज आहे. काही ठिकाणी मतदान प्रतिनिधी नसतानाही मतदारांनी अमोल कोल्हे यांना भरघोस मतदान केले आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनीही फक्त टिव्ही मालिकेत न दिसता, जमिनीवर राहून किमान वर्षातून एकदा तरी मतदारांना दर्शन दिले पाहिजे.
शिरुर मतदारसंघातील निवडणूक ही स्थानिक प्रश्नांपेक्षाही राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मुद्द्यांवर लढली गेली. या निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावापेक्षा शरद पवार व उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती श्रेष्ठ ठरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, फोडाफोडीचे राजकारण ही महायुतीच्या अपयशाची कारणे असून, लोकांनी हातात घेतलेल्या निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून महाविकास आघाडीला यश आले आहे. काही मतदान केंद्रांवर शरद पवार गटाचा पोलिंग एजंट नसतानाही अमोल कोल्हे यांना जास्त मतदान कसे काय झाले? याचे संबंधितांना चिंतन करावे लागणार आहे.
पूर्व हवेलीतील निवडणूक ही मतदारांनी हातात घेतली होती. याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ ने मागील दीड महिन्यांपासून पूर्व हवेलीतील गावांमध्ये विविध शेतकरी, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक, कामगार व भाजी विक्रेते यांच्याशी बोलून आढावा घेतला होता. यावेळी नागरिकांमध्ये असलेला असंतोष, महागाई, कांदा प्रश्न, जीएसटी, मुलभूत गरजा, गॅस सिलिंडर, फोडाफोडीचे राजकारण यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचारात राळ उडवून दिली होती. याचा फायदा निश्चित मतदानातून झालेला दिसून येत आहे. जनतेच्या मनातील असंतोषाला अमोल कोल्हे यांनी प्रचारातून जागा करू दिली.
महायुतीकडे 5 आमदार, मोठ्या व छोट्या गावातील नेतेमंडळी होती. तर महाविकास आघाडीकडे कार्यकर्ते व सामान्य मतदार मोठ्या प्रमाणावर दिसून आला. याशिवाय अजित पवार यांनी आमदारांवर भरोसा दाखविला. मात्र, इतर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका या निवडणुकीत बसला. याउलट शरद पवार यांचे जुने कार्यकर्ते व कार्यकत्यांचे जाळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुनर्जीवित झाले. आमदार अशोक पवार व परिसरातील नागरिकांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विषयीची सहानुभूती या सर्वच गोष्टींचा मेळ निवडणुकीत झालेला दिसून आला.
पूर्व हवेलीतील प्रस्थापित नेतेमंडळींना जनतेने झुगारत महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांना मोठी साथ दिली. कोल्हे यांना मिळालेले मताधिक्य हे अजित पवार यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. नेतेमंडळी ज्या उमेदवाराचा प्रचार करीत होते, त्यांचे काही कार्यकर्ते व मतदारांनी ऐकले नाही. काहींनी उघड व छुप्या पद्धतीने आपल्याला हवे तसे मतदान केले असल्याचे चित्र दिसून आले होते.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कदमवाकवस्ती येथे 90 कोटी रुपयांचे काम सध्या सुरू आहे. हे काम सुरू झाल्यानंतर लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना जाग आली. त्यानंतर त्यांनी पळापळ सुरु केली. तोपर्यंत ही योजना बंद झाली होती. या संदर्भात कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मुद्दा उचलून धरला होता.
राज्य सरकारकडे जलजीवन मिशन योजनेचे साडे तीन हजार कोटी रुपये देणे आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीची 180 कोटी रुपयांची योजना मंजूर करून दिल्यानंतरच हे साडे तीन हजार कोटी रुपये राज्य सरकार केेंद्र सरकारला देईल, अशी माहिती या प्रचारसभेत अजित पवार यांनी दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत अमोल कोल्हे यांना 1865 एवढे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे आगामी काळात काय होणार, हे फक्त अजित पवारच सांगू शकतील.
उरुळी कांचनचे बडे नेते अजित पवारांच्या बाजूने..
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, शिंदवणेसह परिसरातील अनेक गावातील पुढारी हे अजित पवार यांच्या बाजूने होते. सर्वसामान्य मतदार व कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या बाजूने असल्याने उरुळी कांचनसह परिसरात शरद पवार यांचा करिष्मा चालला आहे. मात्र, संबंधित पुढाऱ्यांच्या गावातूनच डॉ. अमोल कोल्हे यांना मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे पुढाऱ्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांच्या गावात तुतारीला ९९७ मतांची आघाडी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या गावात डॉ. अमोल कोल्हे यांना 997 चे मताधिक्य मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री होताच, पूर्व हवेलीमधील अनेक नेत्यांना बाजूला सारुन दिलीप वाल्हेकर यांना जिल्हा नियोजन समितीवर घेतले होते. तसेच त्यांच्या शिफारशीनुसार पुर्व हवेलीमधील विविध विकास कामांसाठी तेवीस कोटी रुपयांहून अधिकचा विकास निधी मंजुर केला होता. असे असतानाही आढळराव पाटील यांना लीड देण्यात वाल्हेकर हे यशस्वी झाले नाहीत. पूर्व हवेलीत प्रयागधाम येथे आढळराव पाटील यांना 79 मतांची आघाडी मिळाली आहे. तर कदमवाकवस्तीत फक्त 187 मतांची आघाडी मिळाली आहे. यानुसार ग्रामीण व शहरी भागात मतदारांनी अमोल कोल्हे यांनाच पसंती दिली असल्याचे मतदानावरून दिसून येत आहे.
पूर्व हवेलीतील गावानुसार पडलेली मते अमोल कोल्हे आणि कंसात आढळराव पाटील
कदमवाकवस्ती 4074, (4261)
लोणी काळभोर, 5352, (3487)
कुंजीरवाडी, 2147, (1155)
आळंदी म्हातोबाची 1880, (818)
थेऊर 2366, (1740)
नायगाव 662, (549)
पेठ 648, (326)
प्रयागधाम – 325, (404)
भवरापूर 284, (140)
कोरेगाव मूळ – 1122, (651)
खामगाव टेक 265, (94)
टिळेकरवाडी 789, (96)
तरडे 703, (272)
वळती 554, (358)
शिंदवणे 1074, (800)
सोरतापवाडी 1232, (1068)
उरुळी कांचन 6787, (4741)