पुणे : अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर जुन्नर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तालुक्यातील पेठेचीवाडी-हडसर, राळेगण व कुसूर या गावांच्या हद्दीत बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारू विक्री करण्याप्रकरणी तिघांविरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
पोलिस शिपाई प्रशांत दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्नर-वडज रस्त्यावर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी कुसूर येथे विकास गायकवाड याच्याजवळील चारचाकी वाहनात (क्र. एम.एच. ०४ एफ.आर. ०२०३) देशी- विदेशी मद्याच्या ९६ बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी वाहनासह ६७ हजार ८६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अंमलदार विलास लेंभे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पेठेचीवाडी येथील पांडुरंग गवारी याच्या राहत्या घराच्या आडोशाला देशी दारूची विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडील ७०० रुपये किमतीच्या दारू बाटल्या जप्त केल्या.
पोलिस अंमलदार दादाभाऊ पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राळेगण येथे चित्रसेन शिंदे हा त्याच्या मालकीच्या पत्राशेडच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत बेकायदा बिगरपरवाना देशी दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडील ४९० रुपये किमतीच्या दारू बाटल्या जप्त केल्या.