रांजणगाव गणपती, (पुणे) : रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनेसांगवी येथील अट्टल गुन्हेगाराकडून 4 गावठी पिस्टल, 12 जिवंत काडतूस, व 3 मॅगझिनसह पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (ता. 26) ही कारवाई करीत 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरज राजेश पाडळे (वय 27,) रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थनिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालीत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोनेसांगवी येथील सुरज पाडळे याच्याकडे अवैध गावठी पिस्तुल असून तो सध्या त्याचे राहते घरी आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज पाडळे याला त्याच्या राहत्या घरी विश्वासात घेऊन तपासणी केली असता, त्याच्या कंबरेला खोवलेले पिस्तुल आणि इतर तिघांनी ठेवण्यासाठी दिलेली शस्त्रे हस्तगत करण्यात आली.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्याने त्याचा मित्र संकेत संतोष महामुनी (रा. सरदवाडी, ता. शिरूर) व दोन मित्र यांनी मध्यप्रदेश येथे जावून प्रत्येकी एक प्रमाणे चार गावठी पिस्तुल विकत घेतले असल्याची माहिती दिली. त्यासोबत जिवंत काडतूस व अधिकचे मॅग्झीन आणले असल्याचे सांगितले.
दरम्यान, गुन्हेगार सुरज पाडळे याचे कब्जातून एकूण 04 गावठी पिस्तुल, 12 जिवंत काडतूस, 03 मॅग्झीन असा 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी सुरज राजेश पाडळे याचेसह इतर तिघांवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज पाडळे आणि संकेत संतोष महामुनी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही शरीराविरुद्ध व आर्म अॅक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. या अवैध शस्त्रसाठ्यामागील हेतू शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अटक आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने या वर्षात आतापर्यंत 7 अवैध शस्त्रे आणि 17 जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे यांनी केली आहे.