पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला जात आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले जात आहे.सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प उभारणीचे काम एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा गाजावाजा करत सुरू केले होते. मात्र, या प्रकल्पाला आता ब्रेक लागला आहे. वनखात्याने या प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दणका बसला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केल्याचा ठपका ठेवत वनमंत्री गणेश नाईक यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. ग्रामीण भागात पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने मुनावळे येथे जल पर्यटन प्रकल्प राबिण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाला वनखात्याच्या आदेशानंतर ब्रेक लागला आहे
वनमंत्री गणेश नाईक यांच्या निर्देशानंतर मुख्य वनरक्षक यांनी लेखी आदेश काढले आहेत. त्यानुसार मुनावळे हे ठिकाण केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधता संरक्षणासाठी इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केले आहे.त्यामुळे या ठिकाणी कोणतेही पर्यटन प्रकल्प राबवताना वन आणि पर्यावरण विभागाशी संबंधित विविध प्रकारच्या 16 परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र या प्रकल्पाला कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान गोड्या पाण्यातील हा देशातला पहिलाच जलपर्यटन प्रकल्प आहे. याच्या उद्घाटनावेळी एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पामुळे स्थानिकांना कसा फायदा होईल हे सांगितलं होतं. मात्र त्यांच्या या प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.