लोणीकंद, (पुणे) : आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी बसण्याच्या कारणावरून चौघांना काठी, दगडाने मारहाण करण्यात आली आहे. हवेली तालुक्यातील बुर्के गावात मंगळवारी (ता. 22) सायंकाळी हि घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर ठोंबरे (वय-38), सुनील ठोंबरे (वय-40), सुनील जांभळकर (वय-42), संतोष जांभळकर (वय-37), सागर जांभळकर (वय -27), विशाल जांभळकर (वय -29), गणेश जांभळकर (वय-35, सर्व रा. बुर्केगाव, नगर रस्ता, ता. हवेली, जि. पुणे) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष महादू पवळे (वय -49, रा. बुर्केगाव) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्के गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी काहीजण बसले होते. त्यावेळी आखाड्याजवळ बसण्याच्या वादातून अभिजित बाजारे आणि शंकर ठोंबरे यांच्यात वाद झाला. वादातून ठोंबरे, जांबळकर यांनी अभिजित बाजारे, संदीप थोरात, सौरभ बाजारे, अभिषेक गायकवाड यांना लाथाबुक्क्या, तसेच काठीने मारहाण केली.
दरम्यान, आरोपींनी त्यांना दगड फेकून मारले. कुस्तीच्या आखाड्यात मारामारीची घटना घडल्याने घबराट उडली. पोलिसांनी याप्रकरणी गर्दी, तसेच मारामारीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.