लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्यात सध्या रात्रीच्या वेळी आकाशात फिरणार्या ड्रोनची प्रचंड दहशत पसरली असून ग्रामीण व शहर पोलीस दलाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नागरिकांना दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतरही पोलिसांनी या संदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस हालचाल केलेली नसल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत.
पोलिसांनी हलगर्जीपणा सोडून तातडीने भयभीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर या प्रकरणातील गूढ उकलण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियातील बहुतेक सर्व व्हाट्सअप ग्रुपवर रात्री फिरणाऱ्या ड्रोनचीच भीतीयुक्त चर्चा सुरू आहे.
रात्री गावात ड्रोन फिरला की दुसऱ्या दिवशी एखाद्या घरात हमखास घरफोडी, चोरी होऊन चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. हवेली, बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांनी उडणाऱ्या ड्रोनचा धसका घेतला आहे. परिसरात एक चोरी झाली की दुसरी चोरी घडल्याची घटना समोर येऊ लागल्या आहेत. रात्रीस चोरट्यांकडून हा खेळ चार – पाच तालुक्यांमध्ये सुरू आहे.
अनेक गावांत घरांच्या वरुन लाईटचा प्रकाश असणारे घिरट्या मारणारे नक्की ड्रोन की इतर काही आहे. याबाबत अनेक चर्चांना आता उधाण आले आहे. चोरटे चोरी करण्यासाठी नक्की ड्रोन कॅमे-याचा वापर करतात का? अशा अनेक शंका मनात घेऊन या तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत झाले असून अनेक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. पोलिसांनी या सर्व प्रकारची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होतं आहे.
अनेक ग्रामस्थांना सतत ड्रोन उडताना देखील पाहायला मिळाले आहेत. त्यात आता अनेक ठिकाणी घरफोड्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. अनेक गावांत मागील काही दिवसांपासून सातत्याने घरफोडीच्या घटना घडत असून पैशांसह मौल्यवान वस्तूंच्या चोरी होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.
चोरटे घरफोडी करत चोरी करुन पसार होत असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. परिसरात रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरे घरासमोरून फिरत असल्याचे अनेक नागरिकांना दिसले आहे. चोरटे ड्रोन कॅमेरा चा वापर करून घरात किती व्यक्ती आहेत ? याची माहिती घेतात का ? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
मात्र, पोलीस या ड्रोनचा शोध लावण्यास अपयशी ठरले असून याचा सुगावा पोलिसांना देखील लागत नसल्याचे चित्र आहे.
बारामतीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यानंतर पवार यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोनद्वारे ड्रोन उडवणाऱ्या आरोपींचा व घडणाऱ्या घटनांचा लवकरात लवकर तपास लावून नागरिकांना दिलासा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही हे कोडं उलगडायला पोलिसांना यश आले नाही.
नागरिकांकडून ड्रोन कॅमेरेच्या संदर्भात तक्रारी नंतर पोलिसांनी काही ठिकाणी खात्री केली, पण ते ड्रोन कॅमेरे असल्याचे आढळून आले नाही. तरीही पोलीस त्या अनुषंगाने सखोल तपास करीत आहेत. मात्र नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात असतांनाच घरफोड्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे नक्की कांय प्रकार चालू आहे हे न उलघडणारे कोडे झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये व वाड्या वस्त्यावर सध्या ड्रोनच्या घिरट्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राञीच्या अंधारात तीन चार वेळा ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत. काही गावांमध्ये चोरीच्याही घटना घडल्या आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस किंवा प्रशासकीय यंञणेकडून खुलासा होणे गरजेचे आहे. ड्रोनच्या या घिरट्यांमुळे राञीच्या वेळी गस्त घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
पूर्वी असलेली पोलीस मित्र संघटना पुन्हा खेडोपाडी निर्माण करावी लागण्याची वेळ आता ग्रामस्थांवर आली आहे. यामध्ये पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, काही तरुण मंडळे आदींनी पुढाकार घ्यावा अशी ग्रामस्थ चर्चा करत आहेत. राञीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून घडत आहे.
राञीच्या वेळीच हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेक गावात आता रात्रीची उशिरापर्यंत गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ड्रोन फिरत असल्याच्या घटनांबाबत प्रशासनाकडून सध्या तरी बघ्याचीच भूमिका घेतली गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार घडूनही ड्रोनच्या घिरट्यांचे गूढ उकलत नसल्याने पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सध्यातरी कुचकामी ठरल्याचे बोलले जात आहे.
जगात एक नंबर असलेल्या स्कॉटलंड यार्ड पोलीस दलानंतर मुंबई पोलीस दल अव्वल समजले जाते. त्या नंतर पुणे शहर पोलिसांची कामगिरी त्या दर्जाची आहे असे समजले जाते. मात्र तरीही पुणे शहर व ग्रामीण पोलिसांना ड्रोनचे गूढ उलगडत नाही. ही दोन्हीही पोलीस दलांच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे. चार-पाच तालुक्यातील जनता प्रचंड भयभीत झालेली असतानाही पुणे शहर व ग्रामीण पोलीसांंनी ही गोष्ट गांभिर्याने घेतलेली दिसत नाही. अजित पवार, अशोक पवार वगळता कुठल्याही राजकीय नेत्याने या संदर्भात काही पावले उचल्याचे दिसत नाही. आता जनतेनेच स्वताची सुरक्षितता पहावी लागेल असे एकंदरीत चित्र आहे.