पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मान्सूनपुर्व जी कामे जिल्ह्यात करायची आहेत, त्या कामांचे सुक्ष्म नियोजन करुन ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत. ही कामे करताना सर्व सबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील असे नियोजन करून, त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने काम करावे अशा सूचना दिल्या आहेत.
येत्या मान्सून काळात आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन नागरिकांना तात्काळ सेवा मिळतील याबाबत नियोजन करावे. तालुकानिहाय रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे साठा तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, याबाबत नागरिकांना माहिती द्यावी अशा सूचना या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी केल्या.
त्याचबरोबर पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित करुन त्याची माहिती प्रशासनाला, महापालिकांना द्यावी. त्याप्रमाणे पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पूर नियंत्रण आराखडा निश्चित करावा. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना वेळेत मिळेल याबाबत नियोजन करावे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या बैठकीत दिली