पुणे: गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाराजीचे वातावरण असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. अशातच आता पक्षांतर्गत असणारा वाद चव्हाट्यावर आला असून पक्षाचे सर्वच प्रवक्ते आणि पदाधिकारी यांच्यावरील नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या निर्णयामागे पक्षातील एका वादग्रस्त विषयावरून निर्माण झालेली अंतर्गत कुरघोडी असल्याच समजतं. याचं कारण म्हणजे 16 एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला विरोध करण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली, याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला. बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाराजीच वातावरण असून पक्षाच्या अंतर्गत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.