पुणे : शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’योजना आता अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलली आहेत. या योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र यावेळी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, फक्त ‘फार्मर आयडी’ असलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये अनेक अपात्र व्यक्तींचा समावेश झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे योजनेचा योग्य लाभ खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता. आता ‘फार्मर आयडी’च्या अटीनंतर, अपात्र व्यक्ती या योजनेपासून आपोआप वगळल्या जाणार असून खऱ्या लाभार्थीपर्यत याचा लाभ पोहचणार आहे.फक्त फार्मर आयडी लिंक केलेल्या खात्यांनाच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली माहिती पीएम किसान पोर्टलवर अद्ययावत करावी, आणि फार्मर आयडी जनरेट केला आहे का याची खात्री करावी.
काय आहे फार्मर आयडी?
फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याची ओळख पटवणारा एक विशिष्ट क्रमांक, जो डिजिटल स्वरूपात तयार केला जातो. सरकार शेतकऱ्यांची माहिती एका केंद्रीकृत डेटाबेसमध्ये संकलित करत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आयडी दिला जातो. या आयडीमध्ये शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, शेतीचे क्षेत्रफळ, पीक पद्धती, बँक खाती आणि इतर माहिती समाविष्ट असते.