छ. संभाजीनगर: महाराष्ट्रात शहराच्या नाव बदलण्याचा सपाटा अजूनही सुरू आहे. दरम्यान, नामांतराचा वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. औरंगजेबाच्या कबरीबाबत राज्यात वातावरण तापले असता आता एका नव्या वादाने डोकेवर काढले आहे , ज्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच, महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर अशी शहरांची नावे बदलत आहे. आता, औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव रत्नापूर करावे अशी मागणी जोर धरत आहे. नाम बदलण्याची मागणी नवनिर्वाचित आमदार संजय केणेकर यांनी केली आहे. दरम्यान, या मुद्यावर बोलतांना त्यांनी सांगितले कि, कबर प्रत्यक्ष उखडण्यापेक्षा ती लोकांच्या मनातून कायमची उखडली गेली पाहिजे.
दरम्यान, यासाठी औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारले जावे आणि खुलताबादला रत्नापूर असे नाव देण्यात यावे असे संजय केणेकर यांनी म्हंटले आहे. यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जे जे बाद आहे, ते आम्हाला बाद करायचे आहे, असे म्हंटले आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपने शहराच्या नावात बदल करण्याऐवजी स्वतःच्या वडिलांचे नाव बदलले पाहिजे, असे म्हंटले आहे.
भाजपवर टीका करत इम्तियाज जलील पुढे म्हणाले कि, शहरांची नावे बदलण्यापेक्षा सरकारने विकासाचे मुद्दे, शेतकऱ्यांच्या समस्या, तरुण, कामगार आणि महिलांच्या हक्कांना प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांचे मत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र औरंगजेबाचे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरव करेल. दरम्यान, नामांतराचा वाद पुन्हा एकदा डोकेवर काढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.