पुणे : खडकवासला धरणातून मंगळवारी (ता. १२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ११ हजार ९०० क्युसेक पाणी सोडले असून चार दरवाजे पाऊणे दोन फुटाने १२७१ क्यूसेकने, तर सात दरवाजे एक फुटाने ८५६ क्यूसेकने पाणी सोडले जात असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली. त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
मागील तीन दिवस खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत होता. परिणामी खडकवासला धरणातील उपयुक्त पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून दुपारी १ वाजता ११ हजार ९०० क्युसेक करण्यात येत आहे. धरण १०० टक्के भरल्याने धरणातून ८५६ क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढवण्यात येईल. पाऊस कमी झाल्यास विसर्ग कमी करण्यात येणार आहे. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांतील मिळून एकूण पाणीसाठा हा २ जुलै २०२२ ला २.५१ टीएमसी इतका झाला. त्यातच जून महिन्यात पाऊस न पडल्याने पाणीटंचाईचे संकट घोंघावू लागले होते. यामुळे पालिकेने पुण्यात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु २ जुलैपासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाला आणि आजही तो चालू आहे.